दुजाभाव : पालक व शिक्षक संतप्त अहेरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत असले तरी यापासून विनाअनुदानित शाळांना वंचित ठेवण्यात येत आहे. शासनाच्या या दुजाभावाबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना गावाजवळ शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने खासगी संस्थांनी ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू केले आहे. मात्र या शाळांना शासनाने विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली. शासनाने शासकीय योजनांमध्येही या शाळांवर अन्याय केला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके खरेदी करावी लागत आहेत. विशेष म्हणजे, सदर पुस्तक बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुस्तके आणायची कुठून असा प्रश्न पालक व शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. काही शाळांचे शिक्षक स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून नागपूर किंवा अन्य ठिकाणावरून पुस्तके आणत आहेत. शाळा विनाअनुदानित आहे म्हणून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. पुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थी या शाळांमध्ये येण्यास सुध्दा तयार होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मिळविणे सुध्दा या शाळांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. विनाअनुदानित शाळांनाही पुस्तके द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
विनाअनुदानित शाळांचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By admin | Updated: July 30, 2016 02:02 IST