ग्रामपंचायत प्रशासनाचा आरोप : वन विभागाने परवानगी घेतली नाहीसिरोंचा : तालुक्यातील रामंजापूर वे. लॅ. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चिंतलपल्ली येथील मामा तलावाच्या पाळीजवळ वन विभागाच्या वतीने ग्रामपंचायतची परवानगी न घेताच बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम अनाधिकृत असून या बांधकामामुळे तलावाच्या पाळीला धोका असल्याने सदर बांधकाम बंद पाडावे, अशी मागणी सरपंच सरीता नर्सय्या तालापेल्ली यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार व संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. चिंतलपल्ली येथील तलावाचे मालकी हक्क सिंचाई विभागाकडे होते. मात्र पेसा कायद्यांतर्गत सदर तलाव ग्रामपंचायत रामंजापूरकडे हस्तांतरीत करण्यात आला. वन विभागाने तलावाच्या पाळीवर खोदकाम करून बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी वन विभागाने मागितली नाही. या बांधकामामुळे भविष्यात तलावाच्या पाळीला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलाव फुटल्यास परिसरातील शेतीचे नुकसान होईल. त्याचबरोबर शासनालाच सदर तलाव दुरूस्त करण्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागतील. ग्रामपंचायत प्रशासनाने वन विभागाकडे तक्रार करून सदर बांधकाम बंद करण्याबाबत अनेकवेळा बजाविले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी बांधकाम बंद ठेवण्यास तयार नाही. तलावाच्या पाळीला होणारा धोका लक्षात घेता महसूल विभागाने हस्तक्षेप करून बांधकाम बंद पाडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी उपसरपंच रवी संतोषपू, ग्रामपंचायत सदस्य पोगालू नर्सय्या, तालेपल्ली नर्सय्या, जनकी संपत नारायण, तालेपल्ली मधुकर बालय्या, पोगुला बानय्या, तालापल्ली स्वामी बालय्या आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
चिंतलपल्ली तलावात अनाधिकृत बांधकाम
By admin | Updated: January 17, 2016 01:22 IST