नगर पंचायतीकडे निधीचा अभाव : तांत्रिक बिघाड दुरूस्तीचा हजारांत होणारा खर्च पोहोचला २५ लाखांवरभामरागड : भामरागडवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकरिता पामुलगौतम नदीवरून शहरात पाणीपुरवठा नळ योजना काही वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. परंतु अल्पावधीतच नळ योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने जलशुद्धीकरण व मोटारपंप गंजून मागील दोन वर्षांपासून भामरागड शहरातील पाणीपुरवठा योजना बंद आहे. येथील तांत्रिक बिघाड दुरूस्तीचा प्रारंभी खर्च जवळपास २५ हजार होता. मात्र सदर खर्च सध्या २५ लाखांवर पोहोचल्यामुळे स्थानिक न. पं. प्रशासनाजवळ निधीचा अभाव असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याला शहरवासीयांना मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा प्राधिकरण योजनेंतर्गत पामुलगौतम नदीतून भामरागड शहरात पाणी पुरवठा नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठ्याकरिता जलशुद्धीकरण यंत्रही बसविण्यात आले होते. परंतु सदर नळ योजना तांत्रिकदृष्ट्या जवळपास दोन वर्षे व्यवस्थित चालली. त्यानंतर वारंवार सदर नळ योजनेत बिघाड होण्यास प्रारंभ झाला. वारंवार बिघाड होत असल्याने तत्कालीन ग्रा. पं. प्रशासनाकडेही तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी निधीचा अभावच जाणवत होता. अनेक नागरिकांकडेही पाणीपुरवठा बिल थकीत होते. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनानेही नळ योजनेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले. तीन नद्यांचा संगम असलेल्या शहराच्या ठिकाणी पाणी मुबलक असतानाही केवळ तांत्रिक बिघाडामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून नागरिकांना मुकावे लागले. सदर वास्तव दोन वर्ष उलटूनही तसेच आहे. नगर पंचायतीची निर्मिती झाल्यास जवळपास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु प्रारंभी तांत्रिक बिघाड दुरूस्तीवर हजारांत होणारा खर्च आता २५ लाखांवर पोहोचला असल्याने स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडेही निधीचा अभाव आहे. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीही सदर नळ योजनेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. २० ते ४० हजार रूपयांचा खर्च करून मोटारपंप दुरूस्ती प्रारंभी काळात करता येऊ शकत होती. परंतु निधीचे नियोजन नसल्याचे कारण दाखवित प्रशासनाने आपले हात वर केले. (तालुका प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून भामरागडची नळ योजना बंदच
By admin | Updated: April 7, 2016 01:25 IST