पोलिसांची कारवाई : छत्तीसगड राज्यातून सुरू होती दारूची वाहतूक गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे व टास्कफोर्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाक्यावर नाकाबंदी करून बुधवारी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांसह एकूण १ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी दारूविक्रेते आरोपी प्रमोद सुधाकर भांडेकर (२६), अरूण देविदास भांडेकर (२८) दोघेही रा. चनकाई नगर गडचिरोली यांना अटक करण्यात आली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन ठाकूर हा फरार झाला असून त्याचा शोध गडचिरोली पोलीस घेत आहेत. गडचिरोली शहरात राहणारे तीन दारूविक्रेते छत्तीसगड राज्यातील औंदी येथून मुरूमगाव-येरकड-धानोरा-गुरवळा-डोंगरगाव मार्गे चामोर्शीकडे दुचाकीने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाक्यावर पाडत ठेवली. दरम्यान एमएच-३३-११०९ क्रमांकाची दुचाकी व एक क्रमांक नसलेल्या दुचाकीला अडविले. यातून ५१ हजार रूपये किंमतीची १७० निपा विदेशी दारू जप्त केली. आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दुचाकींसह दीड लाखांची दारू पकडली
By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST