खरपुंडी नाक्याजवळील घटना : कोरेकट्टानजीक वाहनाची झाडाला धडकगडचिरोेली/मुरूमगाव : गडचिरोलीनजीक आरमोरी मार्गावर खरपुंडी नाक्याजवळ झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी तर धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कोरेकट्टाजवळ झालेल्या अपघातात एक ठार व दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचिरोलीनजीक आरमोरी मार्गावर खरपुंडी नाक्याजवळ भरधाव वाहनाने इसमास धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. तर धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कोरेकट्टाजवळ झालेल्या वाहनाच्या धडकेत एक ठार व दोन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. खरपुंडी नाक्याजवळ झालेल्या अपघातात कप्तानसिंह चव्हाण रा. गुलाबपूर जि. मोरीया (उत्तरप्रदेश) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा बाबीसिंग कप्तानसिंग चव्हाण (१९) रा. गुलाबपूर हा जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार बाबीसिंग चव्हाण व कप्तानसिंग चव्हाण हे दोघेजण सायकलीने गावात कपडे विकण्यासाठी जात होते. दरम्यान खरपुंडी नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत विश्रांती घेत असताना नवेगाव येथील चेतन केवलचंद गोयल (३५) हा आरमोरीवरून गडचिरोलीकडे एमएच-३४-एए-७५५८ क्रमांकाच्या भरधाव चारचाकी वाहनाने येत होता. त्याने चव्हाण बापलेकांना धडक दिली. यात वडील कप्तानसिंग चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा बाबीसिंग चव्हाण हा जखमी झाला. गडचिरोली पोलिसांनी वाहनचालक चेतन गोयल यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगड राज्यातील मानपूरवरून धानोरा तालुक्यातील मुरूमगावकडे येणाऱ्या सीजी-०५८९ क्रमांकाचे चारचाकी वाहनाने कोरेगट्टाजवळ झाडाला धडक दिली. यात वाहनचालक लोमेश भोयर (२२) रा. मुरूमगाव हा ठार झाला. तर भूषण गेडाम (१९), ईश्वर मलय्या (२२) हे दोघेजण जखमी झाले. अपघातग्रस्त वाहन छत्तीसगडमधून महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असल्याची माहिती आहे. छत्तीसगडमधून महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. (प्रतिनिधी)
दोन अपघातात दोन ठार, तीन जखमी
By admin | Updated: February 21, 2016 00:46 IST