गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने दुरूस्तीसाठी नागपूर येथील शोरूममध्ये पाठविलेल्या दोन रूग्णवाहिका पूर्णपणे दुरूस्त झाल्या आहेत. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत सदर रूग्णवाहिका आणण्यास आरोग्य विभाग टाळाटाळ करीत असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामीण रूग्णालयाला एक, उपजिल्हा रूग्णालयाला दोन व गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाला चार रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश रूग्णवाहिकांची आरोग्य विभागाच्या वतीने योग्य देखभाल केली जात नसल्याने त्या भंगार स्थितीत पोहोचल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रूग्णवाहिका शोरूममध्ये दुरूस्त करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार सर्वच रूग्णवाहिका नागपूर येथील शोरूममध्ये पाठविण्यात आल्या. दुरूस्त झालेल्या रूग्णवाहिका परतही आणण्यात आले. मात्र एमएच ३३ जी ७१४ या क्रमांकाची कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाची व एमएच ३३ जी ७११ क्रमांकाची गडचिरोली जिल्हा रूग्णालयाची रूग्णवाहिका दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही परत आणण्यात आली नाही. गडचिरोली जिल्ह्यात आधीच रूग्णवाहिकांची संख्या कमी आहे. अशाच स्थितीत दोन रूग्णवाहिका नागपूरात पडून आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहे. जिल्हा रूग्णालय प्रशासनाने रूग्णवाहिका परत आणाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन रूग्णवाहिका नागपुरातच
By admin | Updated: March 27, 2015 01:04 IST