अरूण राजगिरे कोरेगाव/चोपमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करण्यात आलेली वृक्ष जीवंत आहेत की नाही, याबाबतची तपासणी मोहीम आॅगस्ट महिन्यात राबविण्यात आली होती. या मोहिमेला आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत मानधन मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्राम पंचायत व नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी झाडे लावण्यात येत आहेत. वृक्षलागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असले तरी लागवड झालेल्या वृक्षांपैकी नेमके किती वृक्ष जीवंत आहेत, याचा काहीही अंदाज नव्हता. काही ग्राम पंचायतींनी वृक्षांची लागवड न करताच अनुदान हडप केल्याच्या बाबी संपूर्ण राज्यात उघडकीस आल्या होत्या. अनुदानाचा दुरूपयोग टाळण्यासाठी शासनाने मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी माध्यमिक विद्यालयातील हरितसेनेचे शिक्षक व इयत्ता नवव्या वर्गातील दोन विद्यार्थी यांचा समावेश होता. यासाठी शिक्षकांना प्रतिदिवस २०० रूपये व विद्यार्थ्यांना प्रतिदिवस १०० रूपये प्रमाणे मानधन देण्यात येणार होते. एका ग्राम पंचायतीची दोन ते तीन दिवस तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे शालेय कालावधी वगळून हे काम शाळा संपल्यावर व सुटीच्या दिवशी करण्यात आले. मात्र तपासणी होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही मानधन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
वृक्ष तपासणीचे मानधन रखडले
By admin | Updated: April 10, 2015 01:12 IST