गडचिरोली : विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी गडचिरोली आरमोरी व अहेरी अहेरीच्या नागेपल्ली येथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व क्षेत्रीय कर्मचऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मतदान प्रक्रियेबाबतचे दुसरे प्रशिक्षण ७ आॅक्टोबर रोजी तिनही विधानसभा क्षेत्रात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित प्रशिक्षणाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डी. जे. जाधव यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला ४२० मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार २६० मतदान अधिकारी व ४२ क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. अहेरी तालुक्यातील नागेपल्लीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुलचेराचे तहसीलदार के. डी. मेश्राम व भामरागडचे तहसीलदार येरचे यांनी मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. या प्रशिक्षणाला ३१५ मतदान केंद्राध्यक्ष ९४५ मतदान अधिकारी व ५२ क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. आरमोरी येथील सभागृहात आरमोरीचे निवडणूक अधिकारी एम. ए. राऊत यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र, प्रक्रियाबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी १६५ मतदान केंद्राध्यक्ष, ४९५ मतदान अधिकारी व ३३ क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधी दोन सत्रात पार पडले. (स्थानिक प्रतिनिधी)
मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण
By admin | Updated: September 30, 2014 23:36 IST