देसाईगंज : देसाईगंज मार्गे रायपूरकडे टमाटर घेऊन जाणारा ट्रकसमोर आलेल्या दुचाकीस्वारास वाचिण्याच्या प्रयत्नात शिवसेना कार्यालयाला धडक देऊन ट्रक पलटल्याची घटना देसाईगंज येथे शुक्रवारी घडली. प्राप्त माहितीनुसार आंध्रप्रदेशातील वैशुर्य नारायण रेड्डी यांच्या मालकीचा ए.पी. २१ टी.डब्ल्यू. ४७२२ क्रमांकाचा ट्रक टमाटरने भरलेल्या रॅक घेऊन देसाईगंज मार्गे रायपूरला जात होता. दरम्यान देसाईगंज येथील देसाईगंज-आरमोारी मार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील वळणावर शिवसेना कार्यालयासमोर अचानक समोरून दुचाकीस्वार ट्रकपुढे आला. दरम्यान ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रकने सेना कार्यालयाला धडक दिली व ट्रक पलटला. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात टमाटर भरले होते. ट्रक पलटल्याने ट्रकमधील टमाटरचा रस्त्यावर सडा पडला होता. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे. नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
टमाटरने भरलेला ट्रक पलटला
By admin | Updated: June 28, 2014 00:46 IST