गडचिरोली : चातगाव वन परिक्षेत्रातील दाेन महिलांचा बळी घेणारा जी- १८ वाघ ६ फेब्रुवारी राेजी अमिर्झा उपक्षेत्रातील आंबेशिवणी नियतक्षेत्रातील शेतशिवारात जखमी अवस्थेत आढळून आला. रात्रभर वाघावर निगराणी ठेवून दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी राेजी सकाळी ११ वाजता वाघाला उपचारासाठी जेरबंद केले. सध्या वाघावर नागपूरच्या गाेरेवाडा उपचार केंद्रात उपचार सुरू आहे.
चातगाव वन परिक्षेत्रातील जंगलात विशेषत: अमिर्झा व चातगाव बिटात जी- १८ ह्या वाघाचा वावर आहे. १ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सदर वाघ कुडकवाही शेतशिवारात आढळून आला हाेता. तेव्हासुद्धा आरएफओ व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून परिसरातील मजुरांना जंगलाच्या बाहेर सुरक्षितरित्या काढले हाेते. त्यानंतर वाघाचा याच परिसरात वावर हाेता. ६ फेब्रुवारी राेजी अमिर्झा उपक्षेत्रातील भिकारमाैशीजवळ कंपार्टमेंट नंबर ४१३ मध्ये वाघ जखमी अवस्थेत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व रॅपिड रेस्क्यू टीमला दिसून आले. रात्रभर वाघावर देखरेख ठेवून शुक्रवारी सकाळी आरआरटी, नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रेस्क्यू टीम व शार्पशूटरला बाेलावून उपचारासाठी वाघाला जेरबंद करण्यात आले. सदर घटनेचा तपास चातगावचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. ही कार्यवाही गडचिराेलीचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा, सहायक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
कुंपणाच्या तारांमुळे जखमी?
बेशुद्ध केल्यानंतर वाघाची तपासणी केली असता वाघाच्या समाेरच्या उजव्या पायाला जखम आहे. सुरुवातीला वाघाला उपचाराकरिता चंद्रपूर येथील टीटीसीमध्ये पाठविण्यात आले; परंतु त्याच्या पायाला गंभीर जखम असल्याने त्याला नागपूर येथील गाेरेवाडा रेस्क्यू, ट्रिटमेंट सेंटरवर उपचारासाठी नेण्यात आले. कुंपणाच्या तारांमुळेे वाघ जखमी झाल्याचा अंदाज आहे.
येथील महिलांचा घेतला हाेता बळी
जी- १८ वाघाने आंबेशिवणी व कुरखेडा येथील प्रत्येकी एका महिलेला ठार केलेले आहे. सदर वाघ ४ ते ५ वर्षांचा असून त्याचे वजन जवळपास १५० ते १६० किलाेग्रॅम असल्याची माहिती आहे.