दुकानदार धास्तावले : १ लाख ४१ हजार रूपये लंपासगडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावर आठवडी बाजारानजीक असलेल्या श्री गॅस एजन्सी, भारत गॅस व अष्टभूजा केमिकल्स या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी शनिवारच्या रात्री तिन्ही दुकानातून १ लाख ४१ हजार ५०० रूपयांची रोख लंपास केली आहे. श्री गॅस एजन्सीमधून चोरट्यांनी २४ हजार रूपयांची रोख, अष्टभूजा केमिकल्समधून १ लाख ७ हजार ५०० व भारत गॅस एजन्सीमधून १० हजार रूपयांची रोख चोरट्यांनी लंपास केली आहे. तिन्ही दुकानांचे समोरचे शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. काऊंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली. मात्र इतर कोणत्याही वस्तूची नासधूस केली नाही. शनिवारी सकाळच्या सुमारास दुकानांमधील कामगार दुकान उघडण्यासाठी आले असता, कुलूप तोडला असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तत्काळ तिन्ही दुकानदारांनी याबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी ठाणेदार विजय पुराणिक स्वत: जातीने उपस्थित होते. मात्र सायंकाळपर्यंत चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक वैभव माळी करीत आहेत.अष्टभूजा केमिकल्स या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून या कॅमेऱ्यांची रेकॉर्डींग बंद आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी सोयीचे झाले असते. (नगर प्रतिनिधी)
एकाच रात्री तीन दुकाने फोडली
By admin | Updated: January 10, 2016 01:33 IST