देसाईगंजच्या व्यावसायिकावर धाड : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाईदेसाईगंज : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज येथील नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सन्नी कम्फेक्शनरी दुकानावर धाड टाकून सुमारे पावणे तीन लाखांचा सुगंधीत तंबाखू व भेसळ खाद्य पदार्थ जप्त केले आहेत. याबाबत दुकानमालक प्रकाश कन्हैयालाल उदासी याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. सन्नी कम्फेक्शनरी या दुकानात राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू व गुटख्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर व अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांनी सन्नी कम्फेक्शनरी दुकानावर गुरूवारी धाड टाकली. धाडीदरम्यान कम्फेक्शनरीच्या दुकानात सुगंधीत तंबाखाचे २०० ग्रॅमचे ३४० डबे व ५० ग्रॅमचे ८० डबे आढळून आले. त्याची किमत १ लाख ५६ हजार ७०० एवढी होते. पानमसाल्याचे ९० ग्रॅमचे १७५ पॉकिट आढळून आले. त्याची किमत ८ हजार ५५० रूपये होते. त्याचबरोबर सुपर नावाच्या गुटख्याचे १२० ग्रॅमचे पाच पॉकीट व जाफरानी जर्दाचे ५० ग्रॅमचे ७० पॉकेट आढळून आले. त्याची किमत ६ हजार ४२० रूपये होते. असा एकूण १ लाख ७१ हजार ८७० रूपयांचा प्रतिबंधीत तंबाखू व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. कारवाईनंतर उदासी याच्याविरोधात रात्री उशीरापर्यंत देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र वृत्त लिहिपर्यंत उदासी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (वार्ताहर)
पावणे तीन लाखांचा तंबाखू व भेसळ माल जप्त
By admin | Updated: December 4, 2015 01:44 IST