विद्यार्थी, अधिकारी सहभागी : धनगरांना अनुसूचित जमातीत घेऊ नकागडचिरोली : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी आज शेकडो आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाभरातून शेकडो आदिवासी महिला, तरूण, तरूणी, विद्यार्थी व आदिवासी समाजाचे प्रमुख नेते या मोर्चासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव उसेंडी, दीपक आत्राम, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, प्रकाश गेडाम, रोशन मसराम, क्रांती केरामी, आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी घनश्याम मडावी, काँग्रेस नेते सगुणा तलांडी, सामाजीक कार्यकर्ते देवाजी तोफा, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, प्रा. दौलत धुर्वे, शालीक मानकर, संदीप वरखडे, विलास कोडाप, जि. प. सदस्य सुनंदा आतला, अमरसिंह गेडाम, अॅड. मनिराम मडावी, भरत येरमे, मुकेश नरोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, गोपाल उईके, पितांबर कोडापे, माजी उमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. मसराम, गंगाधर मडावी, विलास कोडाप, वर्षा शेडमाके, अमिता मडावी-लोणारकर आदींनी केले.स्थानिक इंदिरा गांधी चौकात दुपारी १२.३० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित असल्याने धानोरा, चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चा गेल्यानंत नेतृत्व करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी, आमदार व इतरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, युती सरकारच्या काळात तत्कालीन भाजप नेत्यांच्या पुढाकाराने आदिवासी समाजात बोगस लोकांची भरती झाली. शिवाय बोगस आदिवासींना संरक्षण देणारा शासन निर्णय करण्यात आला. काही अधिकाऱ्यांनीही बोगस प्रमाणपत्र वाटण्याचे काम केले. बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताधिक्यावर मोठा परिणाम झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत जाग आली व त्यांनीच आरक्षणाचे हे पिल्लू सोडले व अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याचेही जाहीर करण्यात आले. याला भाजपनेही साथ दिली आहे. मात्र मूळ आदिवासी यापुढे आदिवासी समाजाच्या आरक्षणात कुणाचाही समावेश खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा प्रा. पुरके यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे, असेही प्रा. पुरके यांनी सांगितले. मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त होता. (नगर प्रतिनिधी)
हजारो आदिवासींची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Updated: August 12, 2014 23:44 IST