प्रशासन हादरले : विविध मागण्यांसाठी अहेरी, आरमोरी व कोरचीत चक्काजाम आंदोलनअहेरी/आरमोरी/कोरची : गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी, आरमोरी व कोरची या तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात या तिनही तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तसेच चर्चा करून मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अहेरी, आरमोरी व कोरची तालुक्यातील हजारो संतप्त नागरिकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. अहेरीत श्रीराम जन्मोत्सव समिती तर कोरचीत बिगर आदिवासी संघटना तसेच आरमोरीत ओबीसी संघर्ष कृती समिती व सुशिक्षीत बेरोजगार संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.अहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अहेरीतील मुख्य व अंतर्गत रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी उपविभागात दुष्काळ घोषीत करून आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी श्रीराम जन्मोत्सव समिती अहेरीच्यावतीने आज शनिवारी अहेरीत मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे अहेरी उपविभागाचा विकास रखडला असा आरोप आंदोलनकर्त्या नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळानंतर त्यांची सूटका केली. चक्काजाम आंदोलनादरम्यान उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करून रस्ता बंद केला. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या आंदोलनात श्रीराम जन्मोत्सव समितीचे अमोल मुक्कावार, रवी नेलकुतरी, अमोल बुरेंडीवार, मयूर गुमूलवार, क्रिष्णा ठाकरे, देवेंद्र कतवार, पवन दोंतुलवार, गणपत मडावी, संदीप कोरेत आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरमोरी : ओबीसी संघर्ष कृती समिती व सुशिक्षीत बेरोजगार संघटनेच्यावतीने पेसा कायदा रद्द करावा, जिल्हा निवळ मंडळ स्थापन करून स्थानिक उमेदवारांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी शनिवारी आरमोरी येथे नवीन बसस्टँडसमोर मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पेसा कायद्याच्या शासन निर्णयाची जाळून होळी केली. तसेच तालुक्यातील ठाणेगाव-वैरागड फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.यावेळी पं.स. सदस्य सचिव महाजन, संतोष नैताम, केशव नैताम, बाळाजी इन्कने, नागराज चापले, बबन चापले, अमोल उपरीकर यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली. आरमोरी येथील आंदोलनात पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, सुरज हेमके, सुनिल नंदनवार, अमर खरवडे, महेंद्र शेंडे, सुशील पोरेड्डीवार, गौरव खरवडे, चंदू वडपल्लीवार, आशिष नैताम, नितीन जोध, पुरूषोत्तम सोनटक्के, पंकज आखाडे, नंदू खांदेशकर, अंकूश हेमके, योगेश देविकार, पराग धकाते, अक्षय बेहरे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
By admin | Updated: August 9, 2014 23:41 IST