लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारपासून अनेक भागात पाऊस ओसरल्याने जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र झिंगानूर-रोमपल्ली, आसरअल्ली-सोमनपल्ली यासह काही मार्ग बंदच आहेत. काही भागात घरांची पडझड झाली. त्याचे पंचनामे करणे सुरू आहे. अद्याप कुठेही पाऊस किंवा पूरपरिस्थितीमुळे जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.मागील तीन दिवसात सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात व छत्तीसगड राज्यात झाल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या नद्यांची पाणीपातळी वाढली होती. पर्लकोटाचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. सोमवारी गावातील पाणी ओसरले, मात्र पुलावरून पाणी वाहात होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुलावरीलही पाणी ओसरले. त्यामुळे हा मार्ग आता सुरू झाला आहे. इंद्रावती, पर्लकोटा, गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. मेडिगड्डा बॅरेजचे ६५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग अधिक सुरू आहे.दरम्यान मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात सरासरी २३.६ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक ६९.२ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. भामरागड तालुक्यात ५२.२ मिमी पाऊस झाला आहे. अहेरी तालुक्यात आतापर्यंत १२३३ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस आतापर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या तुलनेत १३८ टक्के आहे.भामरागड तालुक्यात १२४७ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या तुलनेत १२४.८ मिमी आहे. सिरोंचा आणि मुलचेरा तालुक्यातही सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. मात्र धानोरा, कोरची, देसाईगंज तालुक्यात पाऊस पुरेशा प्रमाणात बरसलेला नाही. जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यात सरासरीएवढा पाऊस झाला आहे.जुवी नाल्यावरून धोकादायक प्रवासभामरागड : जुवी नाल्यावर अत्यंत कमी उंचीचा रपटा तयार करण्यात आला आहे. या रपट्यावरून तीन फूट पाणी वाहात असताना परिसरातील काही नागरिक डोक्यावर सामानाचे ओझे घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.भामरागड तालुका मुख्यालयापासून जुवी नाला जवळपास ८ किमी अंतरावर आहे. या नाल्याच्या पलिकडे २० ते २५ गावे आहेत. या गावांना दैनंदिन वस्तू खरेदीसाठी तसेच प्रशासकीय कामासाठी भामरागड येथे यावे लागते. एका स्वयंसेवी संस्थेने या नाल्यावर रपटा तयार केला आहे. मात्र या रपट्याची उंची कमी आहे. भामरागड तालुक्यात तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जुवी नाला ओसंडून वाहात होता. पावसादरम्यान काही नागरिक कामानिमित्त भामरागड येथे आले. मात्र पावसामुळे नाल्याचे पाणी वाढल्याने ते अलिकडेच अडकून पडले. मंगळवारी पाण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र पुलावरून पाणी वाहतच होते. अशाही परिस्थितीत जवळपास १० नागरिकांनी रपट्यावरून प्रवास केला. तिघेजण तर खांद्यावर दुचाकी घेऊन जात होते. पाणी गढूळ राहत असल्याने खाली काहीच दिसत नाही.रेगडी जलाशय १०० टक्के भरलेचामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशय १०० टक्के भरले आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता तलाव पूर्णपणे भरल्याचे सिंचन विभागाने घोषित केले. या जलाशयात ६७.६४ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. रेगडी जलाशयाचे पाणी चामोर्शी तालुक्यात जवळपास ३० किमी अंतरावर पुरवले जाते. या तलावाच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेतजमीन अवलंबून आहे. तलाव पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तिसऱ्या दिवशी पूरस्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST
मागील तीन दिवसात सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात व छत्तीसगड राज्यात झाल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या नद्यांची पाणीपातळी वाढली होती. पर्लकोटाचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. सोमवारी गावातील पाणी ओसरले, मात्र पुलावरून पाणी वाहात होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुलावरीलही पाणी ओसरले. त्यामुळे हा मार्ग आता सुरू झाला आहे.
तिसऱ्या दिवशी पूरस्थिती नियंत्रणात
ठळक मुद्देकाही मार्ग सुरू तर काही बंदच : अनेक घरांची पडझड, मात्र जीवित हानी नाही