पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सत्कारगडचिरोली : स्पर्धा परीक्षेबरोबरच कोणतेही यश लवकर मिळत नाही. अपयशाने खचून न जाता आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहावे. जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १८ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयात युपीएससी व एमपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गडचिरोली जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदार पदावर कार्यरत असलेल्या रामचंद्र नंदावार यांचा मुलगा जितेंद्र नंदावार यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवून केंद्रीय सशस्त्र दलामध्ये असिस्टंट कमांडंट हे पद मिळविले आहे. त्याचबरोबर धानोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या बाबुराव सलामे यांची मुलगी डॉ. माधुरी सलामे हीची एमपीएससी परीक्षेद्वारे मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे. पोलीस मुख्यालयात कार्यक्रमात विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त करताना जितेंद्र नंदावार यांनी कठोर मेहनत करून अथक परिश्रमाच्या माध्यमातून दुर्गम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा परीक्षेत यश संपादन करू शकतात, असे मत व्यक्त केले. माधुरी सलामे यांनी युवतींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोकरीच्या माध्यमातून स्वावलंबी बनावे, असे मत व्यक्त केले. अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. डॉ. माधुरी सलामे व जितेंद्र नंदावार यांचे यश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक शहादेव पालवे तर आभार पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
परीक्षेत यशासाठी सातत्य गरजेचे
By admin | Updated: April 20, 2016 01:36 IST