लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : माओवादग्रस्त जिल्ह्यात उद्योग येत असतील, रोजगार मिळत असेल तर स्वागतच आहे, पण या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला, कंपनीचे शेअर्स द्यावेत, तसेच प्रभावित गावे मॉडेल म्हणून विकसित करावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
लॉयड मेटल्सच्या कोनसरी (ता. चामोर्शी) येथील पोलाद निर्मिती प्रकल्पस्थळावर २३ जानेवारी रोजी पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले आदी उपस्थित होते.
पोलाद निर्मिती प्रकल्पात २ बाय ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईडिंग युनिट), १० दशलक्ष टन प्रतिवर्ष थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट आणि २ बाय ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष आयरन ओर पेलेट प्लान्ट, तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लान्ट (४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) वाढविण्यासाठी झालेल्या जनसुनावणीत पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत स्थानिकांनी आपली मते मांडली. इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह, सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयींबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
खासदारांचीही भेट खासदार डॉ. नामदेव किरसान यांनीही जनसुनावणीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कंपनीने हाती घेतलेले प्रकल्प तसेच सामाजिक बांधिलकीतून राबविले जाणारे विविध उपक्रम याची माहितीदेखील त्यांनी यावेळी जाणून घेतली.
स्थलांतर थांबले, जीवनात स्थैर्य आले कोनसरी परिसरात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. याआधी स्थानिकांना खरीप हंगाम आटोपल्यानंतर रोजगारासाठी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात तसेच तेलंगणा राज्यात जावे लागे. मात्र, या प्रकल्पामुळे हजारो हातांना काम मिळाले. त्यामुळे स्थलांतर थांबले असून कित्येकांच्या आयुष्यात स्थैर्य आल्याची भावना स्थानिकांनी बोलून दाखवली.
नक्षलवादी शिक्का पुसून स्टील सिटी ही नवी ओळख
- आमदार धर्मरावबाबा आत्राम • यांनी आपल्या भाषणात स्थानिकांना रोजगार या अटीवरच जिल्ह्यात नवनवीन उद्योग येत आहेत. यामुळे आदिवासींचे जीवनमान उंचावत आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे. आपण पाहिलेले स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.
- आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, कौशल्याधारित शिक्षण देऊन या भागातील मुलांना चांगल्या संधी मिळू शकतील. जेथे केवळ धान पिकत होते तेथे पोलाद निर्मिती होणार आहे, यामुळे जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल.
- माजी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की, कंपनीने या भागात उद्योग उभारून गडचिरोलीचे मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्याची देशात स्टील सिटी ही ओळख निर्माण होईल, ही बाब मोठी आनंददायी आहे.
अशा आहेत स्थानिकांच्या अपेक्षा.... सुरजागड खाणीतून निघालेल्या लोहखनिजावर हा प्रकल्प आधारित असल्याने येथे स्थानिकांनाच रोजगार द्यावा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करावी, सीबीएससी अभ्यासक्रमाची शिक्षणाचा उत्तम दर्जा असलेली शाळा निर्माण करावी, पर्यावरणविषयक आवश्यक सर्व योग्य उपाययोजना कराव्या, जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक भरपाई देतानाच कंपनीचे शेअर्स द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. जनसुनावणीला पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती.