अहेरी : येथील सहा चोरट्यांनी धारदार शस्त्र व बंदुकीचा धाक दाखवून तेलंगणा राज्यातील आसिफाबाद मंडळांतर्गत येत असलेल्या बुरगुडा गावातील सोन्याचे व्यापारी सुब्बाराव पेदापल्ली यांच्या घरी ५ फेब्रुवारीच्या रात्री दरोडा टाकून सुमारे २ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज लुटला. तेलंगणा पोलिसांनी अगदी दहा दिवसात या प्रकरणाचा छडा लावला असून सहाही आरोपींना १५ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.सुब्बाराव व्यंकटेशम पेदापल्ली हे पत्नी सुमलता, मुलगा देवेंद्र व काकू सोबत सायंकाळी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. दरम्यान, किशोर सतीश जयस्वाल (२७), राजू मासा मडावी, मदनय्या करपा आत्राम (४२) तिघे रा. अहेरी, राकेश लचमा भोयर (२५) रा. किष्टापूर, श्रीनिवास शंकर काटेल (२३), विलास सुरेश राऊत (२८) दोघेही रा. व्यंकटरावपेठा यांनी अचानकपणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून घरामध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी सुब्बाराव पेदापल्ली व त्यांच्या कुटुंबीयांसमोर धारदार शस्त्र धरून तसेच बंदुकीचा धाक दाखवून चूप राहण्यास सांगितले. सुब्बाराव पेदापल्ली यांच्या पत्नीच्या अंगावर असलेले दागिणे हस्तगत करण्यास सुरूवात केली. यामध्ये झालेल्या झटापटीत सुब्बाराव यांच्या पत्नीला इजा झाली. त्याचबरोबर घरातील कपाटामधून सात तोळे सोनेसुध्दा चोरले. असा एकूण १ लाख ४० हजार रूपयांचा सोना, एक लाख रूपये किमतीची रोख रक्कम असा एकूण २ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या दरम्यान दोघांना घरातील बाथरूममध्ये दोघांना बेडरूममध्ये बंद केले होते. चोरीनंतरही त्यांना बंद ठेवूनच ते पसार झाले. काही वेळानंतर सुब्बाराव यांची बहीण सरिता बालीशेवी ही घरी आली असता, तीन मोबाईल पडून तुटले असल्याच्या स्थितीत दिसून आले. तिनेच सर्व कुटुंबीयांची सुटका केली. याबाबतची तक्रार सुब्बाराव यांनी आसिफाबाद पोलीस स्टेशनमध्ये त्याच दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास दाखल केली. आसिफाबादचे सर्कल इन्स्पेक्टर एस. सतीशकुमार यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. तपासामध्ये आरोपीने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील असल्याचे निष्पन्न झाले. आसिफाबादच्या पोलिसांनी अहेरी पोलिसांसोबत संपर्क साधून सहाही आरोपींना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अटक केली. आसिफाबाद कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. चोरी गेलेला सर्व ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)
अहेरीतील चोरांचा तेलंगणात दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:03 IST