गडचिरोली : मौल्यवान व दुर्मीळ सागवानासाठी देशभर ख्याती असलेल्या आलापल्ली (ता. अहेरी) वनविभागातून १० जुलै रोजी सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. ९ जुलैला रात्री वनविकास महामंडळाच्या नागेपल्ली येथील कॉलनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या घरात हरीण शिजत असल्याच्या माहितीवरुन उपवनसंरक्षक दीपाली तलतले यांनी कारवाई केली. शिजवलेल्या मांसासह दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
आलापल्ली येथे घनदाट जंगल असून तेथे विविध वन्यप्राणी आढळतात. ९ जुलैला एका हरणाची शिकार करुन वनकर्मचाऱ्यांनी मांस वाटून घेतले. त्यानंतर ते घरी शिजवले. याच दरम्यान उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांना माहिती मिळाली. त्यांनी अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत ९ जुलै रोजीरात्री ८ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी हरणाचे मांस शिजवित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मांस जप्त केले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वनाधिकाऱ्यांना याच कॉलनीतील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. दहा दिवसांपूर्वीच दीपाली तलमले येथे रुजू झाल्या. वनकायद्यानुसार कारवाईचा पहिला दणका हरणाची शिकार करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना बसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
किती घरांत शिजले मांस?सूत्रांच्या माहितीनुसार, वनाधिकाऱ्यांना याच कॉलनीतील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, नेमके किती घरांमध्ये मांस शिजले याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. हरीण शिकार ते मांस वाटून ते शिजवून खाणाऱ्यांची संख्या मोठी असून शकते, यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आढळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
"हरणाची शिकार करुन मांस शिजवले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, संबंधितांच्या घरी धाड टाकून कारवाई केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरुच आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल."- दीपाली तलमले, उपवनसंरक्षक, आलापल्ली