सिरोंचा : तेलंगणा राज्यात मेडिगट्टा-कालेश्वरसह पाच सिंचन प्रकल्प तेलंगणा सरकार महाराष्ट्राच्या सीमेलगत उभारत आहे. मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गावांची शेतजमीन व घरे पाण्याखाली डुबणार आहे. या प्रकल्पाला मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करार करून औपचारीक मान्यता दिली. याच दिवशी सिरोंचा येथे प्रकल्प विरोधी समितीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकल्पाला असलेला आपला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील वातावरण तापले आहे. मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पामुळे तेलंगणा राज्याला १०० टक्के फायदा होणार असून दोन राज्यात झालेल्या कराराचाही नागरिकांनी निषेध केला आहे. यावेळी शिष्टमंडळात काँग्रेसचे अब्दुल रहीम, राष्ट्रवादीचे कोंडय्या रूद्रशेट्टी, मलिकार्जुन आकुला, नागेश्वर गांगापुरपू, सतीश भोगे, फाजिल पाशा, व्यंकना कुमरे, मनोहर चेडे, प्रकल्प विरोधी समितीचे मधुसूदन आरवेल्ली, सिरंगी लक्ष्मण, पिष्ठला श्रीनिवास, दुर्गम नारायण, समीर अरगेलवार, शाम व्यास, फाजील पाशा मोहम्मद यांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)
दोन मुख्यमंत्र्यांच्या करारानंतर सिरोंचात तणाव
By admin | Updated: March 9, 2016 02:20 IST