गडचिरोली : जिल्ह्यात ३३ पदांसाठी जून महिन्यात तलाठी पदाची परीक्षा घेण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीसाठी राज्यपालांनी अधिसूचना जारी केली. त्यामुळे तलाठी नोकरभरतीची यादी नेमकी कशी लावावी, असा गुंता जिल्हा प्रशासनाला पडला असून याविषयी राज्यपालांचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यंत राज्यपालांकडून मार्गदर्शन मिळाले नसल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. परिणामी उमेदवारांना मागील चार महिन्यांपासून नोकरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. आदिवासींच्या विकासाच्या केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना आहेत. या योजनांवर दरवर्षी हजारो कोटी रूपये खर्च केले जातात. मात्र आदिवासींची स्थिती सुधारली नाही. याविषयी शासनाने विचारमंथन केले. दरम्यान शेकडो योजना असल्या तरी या योजनांची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा कमकुवत असल्याचे लक्षात आहे. आदिवासी भागात कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. जे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तेही कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाही. स्थानिक आदिवासींची भाषा, संस्कृती समजून घेण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना फार मोठी अडचण भासते. हे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे वर्ग ३ व ४ ची पदे स्थानिक आदिवासींमधूनच भरण्याची अधिसुचना महाराष्ट्राच्या राज्यपालाने ९ जून रोजी काढली. दरम्यानच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात तलाठी व पुरवठा विभागाच्या लिपीक पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. या दोनही पदांची २२ जून रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २६ जून रोजी विद्यार्थ्यांचे गुण प्रकाशित करण्यात आले. त्यापैकी लिपीक पदाच्या भरतीचा निकाल लागला असून उमेदवार नोकरीवर रूजूही झाले आहेत. मात्र तलाठी पदाची परीक्षा राज्यपालांच्या अधिसूचनेत रखडली आहे. राज्यपालांच्या अधिसूचनेच्या पूर्वीच तलाठी पदाची जाहिरात काढण्यात आली असली तरी पुढे मागे आपल्यावर येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्यशासनाकडे मार्गदर्शन मागीतले आहे. मात्र राज्यशासनाने अजूनपर्यंत मार्गदर्शन केले नसल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.ज्या परीक्षार्थींना सर्वाधिक गुण मिळाले आहेत. असे उमेदवार याबाबतचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा करीत आहेत. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासन राज्य शासनाचेच मार्गदर्शन मिळाले नसल्याने आपण ही भरती प्रक्रिया पूर्ण करूच शकत नाही. असे उत्तर देत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेचे नेमके काय होणार याकडे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)
तलाठी भरती प्रक्रिया रखडली
By admin | Updated: October 29, 2014 22:50 IST