अहेरी : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या तालुक्यातील पुसूकपटी येथील चिनक्का राजन्ना चौधरी या कर्मचाऱ्याला बेकायदेशिरपणे काढून टाकण्यात आले आहे. तिला कामावर घेण्यात यावे, यासह शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी अहेरी पंचायत समितीसमोर १७ आॅगस्टपासून आयटकच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्त्वात सदर महिला कर्मचाऱ्याने उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र या आंदोलनाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, तालुका सचिव गणेश चापले, तालुकाध्यक्ष भिमन्ना तालावार, अध्यक्ष जुबेदा शेख यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे. जुन्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये शासनाने परिपत्रक आहे. मात्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी चौधरी यांना कामावरून काढण्यात आले. आंदोलनाला जि. प. सभापती सुवर्णा खरवडे, सुखदेव दुर्योधन, गटशिक्षणाधिकारी विक्रम गिऱ्हे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतली आहे. उपोषणामुळे चिनक्का चौधरी यांची प्रकृती बिघडत चालली आहे. (शहर प्रतिनिधी)
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याला कामावर घ्या
By admin | Updated: August 21, 2015 01:57 IST