अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक गडचिरोली : हत्तीरोगमुक्त गडचिरोली जिल्हा करणे आवश्यक आहे. हत्तीरोगमुक्त गडचिरोलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने १० आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या औषधीकरणात सहभाग नोंदवावा, तसेच स्वत:ला या आजारापासून दूर ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत औषधीकरणाच्या कार्यक्रमाचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. हत्तीरोगामुळे मोठ्या प्रमाणात विकृती येत असते. तसेच यावर कोणत्याही स्वरूपाचा उपाय नसल्याने त्यावर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. त्यामुळे सर्वांनी न चुकता या औषधीकरणम मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी यावेळी केले. हत्तीरोग आणि इतर कीटकजन्य आजारांना रोखण्यासाठी १० ते १६ आॅगस्टदरम्यान हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत एकदिवशीय औषधोपचार देण्यात येणार आहे. जनतेने हा एकदिवशीय औषधोपचार डोस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घ्यायला पाहिजे, या औषधोपचारामुळे शरीरात हत्तीरोगाचा जंतू असल्यास तो तत्काळ नष्ट होतो. हत्तीरोगावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात, हत्तीरोगाचा जंतू शरीरात असला तरी त्याचे विशिष्ट असे लक्षण दिसून येत नाही, असे आव्हाड यावेळी म्हणाले. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता खवले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) अशा प्रकारे सेवन करा गोळ्या हत्तीरोग हा आजार ज्याला नाही, त्यांनी सुद्धा एकाच वेळी जेवण करून अथवा नाश्ता करून औषधी घ्यावी, उपाशापोटी औषधी घेऊ नये, २ वर्षांपेक्षा कमी व १ वर्षापेक्षा जास्त असलेल्या बालकास फक्त अल्बॅडाझोल अर्धा गोळी (२०० एम.जी.), २ ते ५ वर्षांपर्यंत डी.ई.सी. गोळी एक अल्बॅडाझॉल एक, ६ ते १४ वयोगटातील बालकांना डी.ई.सी. दोन व अल्बॅडाझॉल एक तसेच १५ वर्षांच्या वरील सर्वांनी ३ डी.ई.सी. व अल्बॅडाझॉल एक घ्यावयाची आहे. गंभीर आजारी, गरोदर स्त्री, दोन वर्षांखालील बालके यांना डी.ई.सी. गोळ्या देऊ नये, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. जे. पांडे यांनी बैठकीत दिली.
हत्तीरोगमुक्तीसाठी पुढाकार घ्या
By admin | Updated: August 11, 2016 01:36 IST