चामोर्शी तालुका : १५५ गावांमध्ये मुक्तिपथ अभियान सुरू लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : दारू व तंबाखूमुक्तीच्या दिशेने सुरू झालेले मुक्तिपथ अभियान ९ महिन्यांपासून राबविले जात आहे. या अभियानात तहसीलदारांनी आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अरूण येरचे यांच्यासह राजेंद्र अनिवार, संवर्ग विकास अधिकारी गोविंद खामकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, वनाधिकारी के. आर. धोंडणे, एच. एस. मेश्राम, पेडिवार, ज्योत्सना कावळे, रायपुरे, देशमुख, उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक कुनघाडकर उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यातील २११ गावांपैकी १५५ गावांमध्ये गाव संघटना गठित करून लोकांना दारू व तंबाखूमुक्तीचे दुष्परिणाम सांगण्यात आले. मार्र्कं डा देवस्थान या ठिकाणी व्यसनमुक्त यात्रा भरविण्यात आली. रॅली, पथनाट्य, पोस्टर आदींच्या माध्यमातून नागरिकांना दारू व तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले आहेत, अशी माहिती मुक्तिपथ अभियानचे तालुका संघटक संदीप वखरे यांनी दिली. एकूण ७५ ग्राम पंचायतीपैकी ५७ ग्राम पंचायतीमध्ये समित्या गठित करण्यात आल्या आहेत. मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती मुक्तिपथ अभियानच्या कार्यकर्त्यांनी दिली. सदर अभियानाला गती देण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले.
तहसीलदारांनी घेतला आढावा
By admin | Updated: May 31, 2017 02:20 IST