गडचिरोली : स्वाईन फ्लू हा आजार भारतात २00९ मध्ये आला. त्यावेळी या आजारावरील उपचारही नव्हते. तरी मृत्यूची संख्या केवळ ६ टक्के होती. आज या आजारावर औषधोपचार वाढले असतानाही, मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात भारतात २0३८ रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळले असून, १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात सावली येथे स्वाईन फ्लूच्या आजाराने ४२ वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात २० संशयीत रूग्णही आढळलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांनी दक्ष राहून वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले आहे.स्वाईन फ्लू हा श्वसनक्रियेसंबंधित होणारा आजार आहे. एच१एन१ या व्हायरसमुळे हा आजार होतो. हा व्हायरस डुकरांमध्ये आढळतो. डुकरांमधून माणसांमध्ये याचा प्रसार कमी प्रमाणात होतो. मात्र माणसांमध्ये याचा प्रसार झपाट्याने होतो. या आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, सर्दी, शिंका येणे, सुस्ती, थकवा, मळमळ, उलटी हे प्रकार दिसून येतात. थुंकीच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार होतो. याचा व्हायरस २ तास जिवंत असतो. या आजाराचा वेळीच उपचार न झाल्यास न्युमोनिया होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. या आजारापासून बचावण्यासाठी काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयांने स्वाईन फ्लू आजारासंदर्भात विशेष वार्ड उघडला आहे. या दोन वार्डात चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या वार्डात व्हेंटिलेटर, आॅक्सिमीटर, मॉनिटरची व्यवस्था आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयास प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात स्वाईन फ्लूचे औषधे पुरविण्यात आली आहेत. स्वाईन फ्लूचा संशयीत रूग्ण आढळून आल्यास त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचे आदेश ग्रामीण रूग्णालयांना देण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आज व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे गुरूवारी जिल्ह्यातील स्वाईन फ्लू आजाराबाबतची माहिती जाणून घेतली, अशी माहिती डॉ. खंडाते यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
गडचिरोलीलाही स्वाईन फ्लूचा धोका
By admin | Updated: February 7, 2015 00:49 IST