आरमोरी वसतिगृहातील प्रकार : कौस्तुभ दिवेगावकर यांची माहितीगडचिरोली : आरमोरी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विनापरवानगीने संचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून निलंबित करणार असल्याची माहिती गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की, आरमोरीतील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात काही मुले विनापरवानगीने येऊन संचार करीत असल्याची तक्रार आपणाकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने आपण शनिवारी संध्याकाळी ७ वाजता वसतिगृहाला भेट दिली. यावेळी मुलांच्या वसतिगृहातील चार तरुण मुले मुलींच्या वसतिगृहात भोजन वाढायला आल्याचे दिसले. एक वयोवृध्द पुरुष स्वयंपाकीही दिसला. शिवाय एका गंजात भाजीपाला व दारुच्या बाटल्याही दिसून आल्या.हे तरुण मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकेला धमकावून आत यायचे. याबाबत मुलींनी संबंधित मुलांची नावे सांगितली असून, त्यांना वसतिगृहातून निलंबित करणार असल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले. मुलींच्या वसतिगृहाला भोजन देणाऱ्या ‘सेवा एजन्सी’ला काळ्या यादीत टाकणार असल्याचे ते म्हणाले. ही एजन्सी गडचिरोलीतील एका इसमाची आहे. विशेष म्हणजे, ज्या एजन्सीला भोजन वा साहित्य पुरवठ्याचे कंत्राट दिले जाते, ती एजन्सी वा कंत्राटदार दुसऱ्या कंत्राटदाराकडे संबंधित काम सोपवित असल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या वसतिगृहाचे अधीक्षक मुख्यालयी राहत नाही, त्यांची वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिवेगावकर यांनी दिला. तालुका मुख्यालयी असलेल्या वसतिगृहांमध्ये सुरक्षा रक्षक नेमून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली. अनेक पुरवठादार चांगल्या प्रतीच्या वस्तुंचा पुरवठा करीत नाही किंवा कमी वस्तू पुरवून जादा बिल आकारतात, त्यांचीही तपासणी करणार असल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)राजकारण मुळीच खपवून घेणार नाहीआदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळून ते कर्तबगार झाले पाहिजेत. हे शासनाचे व आपलेही धोरण आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेळीअवेळी वसतिगृहाला तसेच आश्रमशाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करतात. यामुळेच वसतिगृहाबाहेरील विद्यार्थी वसतिगृहात खुलेआम मुक्काम ठोकत असल्याचे आपल्याला खात्रीशीर कळले आहे. आश्रमशाळा व वसतिगृहात राजकारणाला मुळीच थारा नाही. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडल्यास राजकारण करणाऱ्या संबंधित संघटनाच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच दोषी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिवेगावकर यांनी दिला.
‘त्या’ विद्यार्थ्यांना निलंबित करणार
By admin | Updated: February 1, 2016 01:29 IST