आणखी तक्रारी प्राप्त : मुस्लीम वेल्फेअर सोसायटीची मागणी गडचिरोली : जिल्हा रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांनी शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख यांच्या प्रसूतीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे बाळ गर्भाशयातच दगावले. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर दोन सदस्यीय स्थानिक समितीने चौकशी केली. यात डॉ. किलनाके हे दोषी आढळून आले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे डॉ. किलनाके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आधी त्यांना सेवेतून निलंबित करावे, त्यानंतरच या प्रकरणाची पुढील चौकशी करावी, अशी मागणी मुस्लीम वेल्फेअर सोसायटी गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख, सचिव अकील अहमद शेख, सहसचिव हबीब खॉन पठाण, सोसायटीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आयशा अली, शहर अध्यक्ष यास्मीन शेख, फरजाना शेख, अनवरी शेख, शकील शेख, सिकंदर खॉ पठाण, शहनाज खॉ पठाण, शकिला पठाण आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख व सचिव अकील शेख यांनी सांगितले की, डॉ. प्रविण किलनाके यांनी हेतुपुरस्सर गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. परिणामी वेळेत सिजर प्रसुती न केल्याने शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिच्या बालकाचा गर्भाशयातच मृत्यू झाला. तसेच किलनाके यांच्या दुर्लक्षितपणामुळे ज्योती चंद्रमनी मेश्राम यांचेही बाळ गर्भात दगावले, अशी तक्रार मुस्लिम वेल्फेअर सोसायटीकडे प्राप्त झाली आहे. त्रिसदस्यीय विभागीय समितीमार्फतही बाळ दगावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र यासंदर्भातील अहवाल आमच्याकडे अद्यापही प्राप्त झाला नाही. सदर प्रकरणाची तक्रार पुन्हा राज्याच्या आरोग्य संचालकाकडे केली आहे, असेही मुस्तफा शेख यांनी सांगितले. सामान्य रुग्णालयातील काही डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ बंद करावा व दोषींना पाठिशी घालू नये, असेही सोसायटीचे पदाधिकारी म्हणाले.
गुन्हा दाखल करून किलनाकेंना निलंबित करा
By admin | Updated: March 2, 2017 01:58 IST