वांगेपल्लीतील वसतिगृह : विद्यार्थिनींनी केले रस्त्यावर अन्नाचे गंज घेऊन आंदोलन ; कारवाईची मागणी अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथे समाज कल्याण विभागामार्फतीने चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहात अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोप मुलींनी करीत या विरोधात मुलींनी वसतिगृहाबाहेर अन्न भरलेले भांडे आणून आंदोलन केले. मागील आठवड्यात समाज कल्याण विभागाचे निरिक्षक यांनी वसतिगृहाला भेट दिली होती. त्यावेळी मुलींनी जेवनाबाबत त्यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्या जाऊ लागले. याबाबतची तक्रार वसतिगृह प्रमुखाकडे केली असता, आपण या अगोदर ज्यांना तक्रार केली, त्यांनाच सांगा, असे उत्तर वसतिगृह प्रमुखांनी दिले. त्यामुळे विद्यार्थिनींचा नाईलाज झाला. परिणामी विद्यार्थिनींनी अन्न भरलेले गंज व इतर भांडे अहेरी मार्गावर आणून आंदोलन केले. वसतिगृहात मुलींना पोटभर जेवन दिल्या जात नाही. सर्व मुलींना केवळ दोन पोळ्या व एक प्लेट भात दिल्या जाते. जेवनामध्ये अळ्या राहतात. भाजीत पाणी टाकले जाते. जाड तांदळाचा भात दिला जातो. चिकनमध्ये पाणी जास्त टाकले जाते. केळी व सफरचंद चांगल्या दर्जाचे नसतात. याबाबत वारंवार वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही, असे आंदोलनकर्त्या मुलींचे म्हणणे आहे. आंदोलनाची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त व्ही. एम. मोहतुरे यांनी वसतिगृहाला भेट दिली व मुलींशी चर्चा केली. त्याचबरोबर मोहतुरे यांनी वसतिगृह प्रमुख, पर्यवेक्षक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुलींनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोहतुरे यांच्यासोबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तावाडे, पोलीस उपनिरिक्षक कोडेकर, तांबूसकर, पोलीस हवालदार संतोष मंथनवार, रिजवान आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी आंदोलन करण्यासाठी वसतिगृहाबाहेर जाताना विद्यार्थिनींना वसतिगृहाचे चौकीदार व पर्यवेक्षक यांनी अडविले असता, चौकीदार, पर्यवेक्षक व आंदोलनकर्त्या मुली यांच्यामध्ये ओढाताण झाली. यामध्ये दोन मुली किरकोळ जखमी झाल्या.
वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळते निकृष्ट जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 01:18 IST