दिवाळीचे औचित्य : हेडरी पोलिसांचा उपक्रमएटापल्ली : दिवाळीनिमित्त पोलीस मदत केंद्र हेडरीच्या वतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना फराळ तसेच इतर शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आल्या. पोलिसांकडून देण्यात आलेल्या मेजवानीने विद्यार्थी भारावून गेले. अध्यक्षस्थानी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भागवत मुळीक होते. प्रमुख अतिथी म्हणून साीआरपीएफचे असिस्टंट कमांडर शहाजहा, विनोबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नामनवार, पोलीस उपनिरीक्षक बोराटे, मुऱ्हाटे यांच्यासह पोलीस दलाचे जवान तसेच विनोबा आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोेलीस मदत केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसोबतच गावातील महिला बचतगटाच्या सदस्या, सीआरपीएफ, एसआरपीएफ, जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनासुद्धा फराळाचे वितरण करण्यात आले. सदर फराळ हेडरी गावातील अमरज्योती बचत गटाकडून तयार करण्यात आला होता. संचालन ललीत जांभुळकर तर आभार बोराटे यांनी मानले. एसडीपीओ नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. (तालुका प्रतिनिधी)
मेजवानीने विद्यार्थी भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 01:03 IST