पेटतळा व जांभुळखेडात उपक्रम : विविध घोषवाक्यांच्या मदतीने मतदानाचे आवाहन कुरखेडा/घोट : कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभुळखेडा व चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा तसेच तलाठी कार्यालय पेटतळाच्या वतीने गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभुळखेडाच्या वतीने गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत गटशिक्षणाधिकारी शिवणकर यांच्यासह शाळेचे शिक्षक व गावातील नागरिक सहभागी झाले होते. गावातील मुख्य मार्गाने विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावावा. पैसा, दारू यासारख्या प्रलोभनांना बळी न पडता स्वत:च्या सद्विवेक बुद्धीने मतदान करावे, असे आवाहन केले. चामोर्शी तालुक्यातील पेटतळा येथे तलाठी कार्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली. गावातील मुख्य मार्गाने विद्यार्थ्यांनी रॅली काढली. यशस्वीतेसाठी तलाठी बाळापुरे, पोलीस पाटील जयेंद्र बर्लावार, मुख्याध्यापक वासुदेव कुनघाडकर, पुरूषोत्तम किरमे, राऊत, दर्रो, निर्मल पवार यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (लोकमत वृत्तसेवा)
विद्यार्थ्यांनी केली मतदारजागृती
By admin | Updated: February 13, 2017 01:59 IST