१४ जण सुखरूप : चिंगली, मोहली गावची होती सर्व मुले धानोरा : धानोरा येथील चिल्ड्रेन पॅराडाईज कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना घरी सोडून देत असताना व्हॅनने अचानक पेट घेतला. सदर घटना सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे या व्हॅनमधून जाणारे १४ विद्यार्थी सुखरूप बचावले. शुक्रवारी सायंकाळी चिल्ड्रेन पॅराडाईज कॉन्व्हेंट धानोराच्या १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व्हॅन मोहली, जांगदा, चिंगली आदी गावांकडे निघाली होती. एमएच ३१ के २९१३ क्रमांकाच्या गाडीत १५ विद्यार्थी होते. सोडेगावात एका विद्यार्थ्याला सोडल्यानंतर १४ विद्यार्थी घेऊन व्हॅन पुढे निघाली. धानोरापासून चार किमी अंतरावर पुसावंडी गावाजवळ गाडीत वास येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने गाडी थांबवून १४ विद्यार्थ्यांना बाहेर काढले व गाडीत असलेल्या बॅग व बॉस्केटही बाहेर काढल्या. त्यानंतर लगेच गाडीने जोरदार पेट घेतला. चालक भुपेंद्र ऋषी म्हशाखेत्री यांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी सुखरूप राहिले. (प्रतिनिधी)
विद्यार्थी वाहून नेणारी व्हॅन पेटली
By admin | Updated: March 4, 2017 01:14 IST