ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि.04 - चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथील एका युवतीला नोकरीचे आमिष दाखवून धावत्या खासगी बसमध्ये तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणा-या रवींद्र बावणथडे या भाजपाच्या माजी पदाधिका-यास नागभीड पोलिसांनी सोमवारी रात्री ब्रह्मपुरी येथून अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले असता, ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रवींद्र बावणथडे याने खासगी बसमध्ये युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा व्हिडीओ व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला. यानंतर सदर युवतीने नागभीड पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र बावणथडे याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बावणथडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून रवींद्र बावणथडे फरार होता. पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री ब्रह्मपुरी येथून अटक केली. भाजपाने मात्र रवींद्र बावणथडे हा भाजपाचा पदाधिकारी असल्याबाबतचे हात झटकले आहेत. रवींद्र बावणथडे याचा भाजपाशी काहीही संबंध नसून त्याने पाच महिन्यांपूर्वीच आपले पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी दिली आहे. बावणथडेच्या कृत्याचा भाजपा जाहीर निषेध करीत असल्याचेही खासदार अशोक नेते यांनी म्हटले आहे.