तीन लाखांचे नुकसान : दुधाळ जनावरे झाली जखमी लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : २६ मे च्या रात्री झालेल्या वादळामुळे तालुक्यातील घारगाव येथील निशांत सुखदेव नैताम यांच्या गोठ्याचे टीनपत्रे उडून गेले. यामध्ये नैताम यांचे जवळपास तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घारगाव परिसरात २६ मे च्या रात्री प्रचंड प्रमाणात वादळ झाले. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील कवेलू उडून गेले. निशांत नैताम यांनी दुधाळ जनावरांसाठी टीनपत्र्यांचा गोठा तयार केला आहे. या गोठ्यात गायी व म्हशी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. वादळामुळे गोठा कोसळला. त्याचबरोबर टीनाचे पत्रे उडून गेले. याबाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत यांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळ गाठले व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, घारगावचे उपसरपंच नामदेव झलके, पोलीस पाटील हेमाजी आभारे उपस्थित होते. तलाठी एन. एच. चंदनखेडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला. गोठ्यामध्ये १२ म्हशी व ६ वगाळू होते. ते जखमी झाले आहेत. गोठा कोसळल्याने गुरांना ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैताम यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी निशांत नैताम व जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.
वादळाने गुरांचा गोठा कोसळला
By admin | Updated: May 28, 2017 01:20 IST