वैरागड : जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. जमिनीला भेगा जाऊन वाळवी लागली आहे. त्यामुळे वैरागड येथील शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीच्या काठावर असलेल्या पुरातन भंडारेश्वर मंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक करून पावसासाठी देवाला साकडे घातले. यावेळी बहुसंख्य शेतकरी भाविक उपस्थित होते. अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामात कोरडा दुष्काळ सदृष्य परिस्थिती जिल्ह्यातील अनेक भागासह वैरागड परिसरात निर्माण झाली आहे. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात आहेत. त्यामुळे वैरागड येथे गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवरील भंडारेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अनेक शेतकरी पुरूष, स्त्रिया व युवक उपस्थित होते. यावेळी भंडारेश्वरातील शिवलिंगावर नदीतून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला. मंदिरातील गाभारा पूर्णपणे पाण्याने भरण्यात आला. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, सरपंच सेवानंद सहारे यांच्या उपस्थितीत शिवलिंगाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पंच कमेटी, श्रीक्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, हनुमान/महादेव मंदिर देवस्थान समितीने पुढाकार घेतला होता. गावातील नागरिकांनी घागरी, कळसे, बादलीच्या माध्यमातून नदी पात्रातील पाणी आणून भंडारेश्वरातील शिवलिंगावर जलाभिषेक केला. त्यानंतर पाच पांडव देवस्थान, आदी शक्ती माता मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी बहुसंख्येने पूजाअर्चेत सभाग दर्शविला होता. त्यामुळे धार्मिक उत्सवाचे वातावरण मंदिर परिसरात निर्माण झाले होते. वैरागड परिसरात अनेक शेतकऱ्यांचे पीक करपल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे मागील २० ते २५ दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील दोन दिवसापूर्वी या परिसरात तुरळक स्वरूपातच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाला फारसा फायदा झाला नाही. वैरागड परिसरातील शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.(वार्ताहर)
पावसासाठी भंडारेश्वराला साकडे
By admin | Updated: August 30, 2014 23:46 IST