संप मागे : कर्मचाऱ्यांनी केले मुंडण आंदोलनगडचिरोली : एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना घेऊन इंटक या कामगार संघटनेच्या नेतृत्वात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून संप पुकारला होता. यादरम्यान कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर सदर संप शुक्रवारी सायंकाळी ३ वाजताच्या सुमारास मागे घेण्यात आला. त्यानंतर एसटी कर्मचारी कामावर परतले व सायंकाळी ५ वाजेपासून गडचिरोली आगारातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात २५ टक्के वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून संपाचे हत्यार उपसले होते. सदर आंदोलन शुक्रवारीही दुपारी ३ वाजेपर्यंत सुरूच होते. या संपामुळे प्रवाशांचे फार मोठे हाल झाले. खासगी वाहनचालकांनी गुरूवारपासूनच तिकिटात सुमारे दीड पट वाढ केली होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांनी आंदोलकांची भेट घेतली. सायंकाळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर यांच्या उपस्थितीत संप मागे घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एसटी कर्मचारी कामावर परतले
By admin | Updated: December 19, 2015 01:22 IST