चामोर्शी : मागील महिन्यात चार नक्षत्र संपूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतीच्या हंगामाला दमदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामाला लागला आहेत.दमदार पावसामुळे सखल भाग, नदी, नाले, तलाव, बोडी आदी जलसाठे पाण्याने भरल्याने शेतकरी सुखावला आहे. यंदा तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांनी शेतात संकरीत धानाची लागवड केली आहे. परंतु पावसाचे आगमन उशीरा झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यताही शेतकरी वर्तवित आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, अशा शेतकऱ्यांनी जून महिन्यात धानाचे पऱ्हे टाकले. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नव्हती, अशा शेतकऱ्यांना पावसाच्या पहिल्या पाण्यावरच हंगामाला सुरूवात करावी लागली. त्यामुळे सुरूवातील पेरणी केलेले पऱ्हे करपले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली. सुरूवातीस वाढलेल्या पऱ्ह्यांची रोवणी करण्याचे काम सध्य:स्थितीत जोमात सुरू आहे. परंतु उशीरा हंगाम झाल्याने धान रोवणीचे काम दोन टप्प्यात होईल, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही कालावधीनंतर निसर्गाने साथ दिली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दोन दिवसापासून मुसळधार व रिपरिपयुक्त पावसाने रोवणी हंगामास सुरूवात झाल्याने तालुक्यात मजुरांचा तुटवडाही जाणवत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने रोवणीचे काम ठप्पही पडले होते. परंतु उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे मात्र रोवणी हंगामाला सुरूवात झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शी तालुक्यात रोवणीच्या कामाला वेग
By admin | Updated: July 23, 2014 00:01 IST