देसाईगंज : तालुक्यातील शंकरपूर - विसोरा गावाच्या दरम्यान वाहणाऱ्या गाढवी नदीवरील पुलाच्या बांधकामाला वेग आला आहे़ मे महिन्यापर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. मात्र दोन्हीकडील रस्त्याच्या कामाकरिता प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कुरखेडा, कोरची तसेच छत्तीसगड राज्याला जोडणारा दुवा असलेल्या गाढवी नदीवरील पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे़ सुरूवातीच्या वर्षी पुलाच्या डिझाईनमध्ये कमतरता दिसून आल्याने नवीन डिझाईन तयार करण्यात आली़ त्यानंतर पुलाच्या कामाला रितसर सुरूवात झाली़ जुन्या पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पुरामुळे कित्येक दिवस रहदारी बंद असते़ त्यामुळे पुलाच्या बांधकामाकडे सर्वाचे लक्ष लागले होते़ मागील तिन्ही वर्षी अतिशय मंद गतीने काम सुरू होते़ पावसाळयात काम बंद झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कामाला पुन्हा सुरुवात झाली होती. वर्षातून केवळ सहा महिनेच पुलाचे काम सुरू राहत होते. मात्र या वर्षी या कामाला अचानक वेग आला आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या मे महिन्यापर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे़ मात्र पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याचे काम पूर्ण होण्यास प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़ (वार्ताहर)
गाढवी नदी पुलाच्या बांधकामाला वेग
By admin | Updated: March 13, 2015 00:07 IST