अक्षय मनिराम पदा (२२) असे आरोपी मुलाचे नाव असून, मनिराम बाजू पदा (५३) असे मृत वडिलांचे नाव आहे.
मृत व आरोपी हे एकत्र राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी मुलगा हा नातेवाईकाच्या अंत्यविधीकरिता धानाेरा तालुक्यातील कोंदावाही येथे गेला होता. तेथून परत आल्यानंतर तू मरणाला का गेलास मला का जाऊ दिले नाही, असा प्रश्न वडिलांनी मुलाला विचारला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान चिडून बापाने फरशीने मुलाच्या पोटावर वार केला. त्यावेळी तीच फरशी हिसकावून मुलाने बापाच्या गळ्यावर उलट वार केला. यामध्ये वडील जागीच ठार झाले. जखमी मुलास धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याचीसुद्धा प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी करीत आहेत.