देसाईगंज : स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत तालुक्यात एकूण तलाठी कार्यालय आहे. यापैकी सहा तलाठी कार्यालयातील तलाठ्यांना पदोन्नती देऊन इतरत्र स्थानांतरण करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील सहा तलाठी कार्यालयाचा कारभार प्रभारी तलाठ्यांच्या खाद्यांवर सोपविण्यात आले आहे. प्रभारी तलाठ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळेवर तलाठी मिळत नसल्याने कागदपत्रासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाट्या मारावे लागत आहे. यामुळे महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देसाईगंज तहसील कार्यालयांतर्गत आमगाव येथील तलाठी पोहणकर, विर्शी तुकूमचे तलाठी बारसागडे, शंकरपूर साझ्याचे तलाठी कत्रे, कोकडी साझ्याचे तलाठी रामटेके, चोप साझ्याचे तलाठी खेवले व पोटगाव साझ्याचे तलाठी ठाकरे यांना मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून त्यांना इतरत्र स्थानांतरीत करण्यात आले. पदोन्नतीमुळे आमगाव, विर्शीतुकूम, शंकरपूर, कोकडी, चोप, पोटगाव या सहा साझ्यातील रिक्त झालेल्या तलाठ्यांच्या जागा जिल्हा महसूल प्रशासनाने भरल्या नाही. तसेच याबाबत ठोस उपाययोजनाही केली नाही. त्यामुळे सहा तलाठ्यांवर या सहा साझ्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची तलाठी कार्यालयाकडे धावपळ सुरू आहे. कृषी योजनांसाठी तसेच पीक कर्जासाठी शेतकरीही कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सहा तलाठी कार्यालय वाऱ्यावरच
By admin | Updated: July 21, 2014 00:10 IST