कामे खोळंबली : पंचायत समितीमधील स्थितीचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी पंचायत समितीमध्ये एकूण सहा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत एकूण ७५ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये २२६ गावांचा समावेश असून तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७९ हजार १२० एवढी आहे. पंचायत समितीला जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील दुवा मानल्या जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक विविध कामांसाठी पंचायत समितीमध्ये येत असतात. मात्र पंचायत समितीला रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. त्यातही अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आयआरडीपी), विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी शिक्षण अशा सहा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यांची आहे. प्रत्यक्ष कामाला भेट देऊन त्याची पाहणी करण्याची जबाबदारीसुद्धा विस्तार अधिकारी पार पाडतात. मात्र ही पदे रिक्त असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर दिसून येत आहे. याबाबत पं. स. चे बीडीओ बादलशाह मडावी यांना विचारणा केली असता, रिक्तपदांबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शीत सहा विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त
By admin | Updated: December 18, 2015 01:59 IST