गडचिरोली : जिल्ह्यातील निस्तार डेपोंमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातही दिवसेंदिवस वाढत चालेलल्या वन विभागाच्या व्यावसायिक वृत्तीमुळे नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे. वयोवृद्ध होऊन सुकलेली झाडे वन विभागाच्यामार्फतीने तोडली जातात. त्यानंतर आणखी तुकडे करून चांगला लाकूड व्यापाऱ्यांना लिलावाच्या माध्यमातून विकला जातो. तर उर्वरित फांद्या जळाऊ लाकडासाठी म्हणून नागरिकांना उपलब्ध करून दिले जातात. दिवसेंदिवस केरोसीन मिळणे कठिण झाले आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या वापरावरही बंधने आले आहेत. त्याचबरोबर अजूनही जवळपास ९० टक्के नागरिकांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध नाही. वन विभाग जंगलातून सरपण आणू देत नाही. त्यामुळे निस्तार डेपोमधील लाकूड खरेदी केल्याशिवाय नागरिकांकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. वन विभागाने नागरिकांना लाकडांचे वाटप करण्यासाठी गडचिरोलीसह अनेक ठिकाणी निस्तार डेपो उभारले आहेत. मात्र या डेपोंमध्ये नेहमीच जळाऊ लाकडांचा तुटवडा राहतो. जळाऊ लाकूड मिळत नसल्याने गडचिरोलीवासीय मागील काही महिन्यांपासून हैराण झाले आहेत. काही नागरिक नाईलाजास्तव जंगलात जाऊन जिवंत झाडांची तोड करीत आहेत. यामुळे भविष्यात जंगल सपाट होण्याची शक्यता आहे.
निस्तार डेपोंमध्ये लाकडांचा तुटवडा
By admin | Updated: February 18, 2015 01:23 IST