जि. प . अध्यक्षांचा पुढाकार : सुंदरनगरात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन मुलचेरा : तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधवांची संख्या जास्त असून त्यांचे मुख्य पीक धान आहे. या वर्षी धानाचे पीक समाधानकारक झाल्याने येथील शेतकरी आनंदित आहेत. मात्र सुंदरनगर परिसरात धान खरेदी केंद्र वेळीच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. येथे धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्याकडे केल्यानंतर जि. प. अध्यक्षांच्या पुढाकाराने येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील १४ ते १५ गावातील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन जि. प. बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजीत स्वर्णकार, सुभाष पटेल, निखिल ईज्जतदार व शेतकरी उपस्थित होते. या परिसरात धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना मुलचेरा येथे धान विक्रीसाठी न्यावे लागत होते. या परिसरातील सुंदरनगर, गोमणी, मछली, मुखडी, गोमणीटोला, श्रीनगर, मोहुर्ली, हरिनगर, मथुरानगर, श्रीरामपूर, चिचेला, कोडीगाव, भगतनगर, भवानीपूर येथील शेतकऱ्यांना अडचण होती. ही बाब जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधिकारी तालुका दौऱ्यावर असताना त्यांच्या लक्षात आणून दिली व लोकांनी धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निवेदने सुद्धा दिली. धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. या नंतर धान खरेदी केंद्र राजीव गांधी सेवा केंद्रात सुरु राहणार असून याचा लाभ परिसरातील सर्व शेतकरी बांधवानी घ्यावे, असे आवाहन कुत्तरमारे यांनी यावेळी केले.
खरेदी केंद्राने १४ गावांची सोय
By admin | Updated: December 23, 2016 01:03 IST