सिराेंचा शहरातील अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्यानंतर त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण सोयीसुविधा व उपक्रम राबविण्यासाठी मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली. वाॅर्डांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, अर्धवट विकास कामे पूर्ण करणे यासह अन्य प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सिरोंचा शहरातील विकास कामाविषयी आराखडा तयार करून नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख (अहेरी क्षेत्र) रियाज शेख यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमित तिपट्टीवार, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी, संघटक दुर्गेश तोकला, युवा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश गट्टू, उज्ज्वल तिवारी, मधुकर इंगिली उपस्थित होते.
न.पं.ला इमारत केव्हा मिळणार?
सिराेंचा नगर पंचायतचा कारभार महसूल मंडळ कार्यालयाचा इमारतीत सुरू आहे. नगरपंचायतची स्वतंत्र इमारत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे सुसज्ज नवीन इमारत आवश्यक आहे. न.पं. ला स्वतंत्र इमारत केव्हा मिळणार? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. न.पं. इमारतीचा प्रश्न मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसमाेर मांडणार, असे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी सांगितले.