तरूणाई डीजेवर थिरकली : विविध वेशभूषा, पारंपरिक नृत्य ठरले आकर्षणगडचिरोली : आरमोरी, अहेरी, देसाईगंज, धानोरा शहरासह गडचिरोली शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारपासून शारदा, दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीची धूम जोमात सुरू झाली. विविध वेशभूषा व पारंपरिक नृत्य आकर्षणाचे केंद्र होते. मिरवणुकीदरम्यान डीजेच्या तालावर तरूणाईसह सारेच जण थिरकले. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.श्रध्दा, उपासना, चैतन्य व उत्साह निर्माण करणाऱ्या नवरात्र उत्सवाला १३ आॅक्टोबर मंगळवारपासून प्रारंभ झाला. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण ७५१ सार्वजनिक मंडळांमार्फत ४४४ शारदा तर २०७ दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. कुरखेडा कॅम्प देसाईगंज अंतर्गत १३० शारदा व ५९ दुर्गा, धानोरा पोलीस उपविभागांतर्गत ४६ शारदा व पाच दुर्गा, घोट कॅम्प चामोर्शी अंतर्गत ५५ शारदा व ४४ दुर्गा तसेच अहेरी उपविभागांतर्गत ७१ शारदा व नऊ दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. जिमलगट्टा उपविभागांतर्गत सहा मूर्तींची तर सिरोंचा उपविभागांतर्गत ५९ शारदा व दोन दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. भामरागड उपविभागांतर्गत पाच ठिकाणी शारदा तर एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत १८ शारदा व पाच दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. शुक्रवारपासून आरमोरी, गडचिरोली, अहेरी, देसाईगंज शहरासह ग्रामीण भागात मूर्ती विसर्जनाला सुरूवात झाली. ढोल, ताशे, डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. अनेक मंडळांच्या वतीने विविध वेशभूषा साकारलेले नागरिक फेर धरून मिरवणुकीत नाचत होते. मिरवणुकीदरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात शारदा, दुर्गा विसर्जनाची धूम
By admin | Updated: October 24, 2015 00:57 IST