विसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरात काही परंपरागत शिकार्यांकडे पारवा, लावा, हारावत यासह अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. शंकरपूर परिसरातील काही शिकारी पाणवठय़ाच्या ठिकाणी पाश टाकून शिकार करीत असल्याने पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शिकारी पक्ष्यांची शिकार करण्याकरिता परिसरात असलेल्या तलाव, बोडी, नाले अशा पाणवठय़ाच्या ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून झोपडीच्या आकाराची ५ फुटाची कुटी तयार करून पाण्यालगत जाळ पसरवितात. पक्षी पाणी पिण्यासाठी पाणवठय़ावर येताच लगेच जाळ ओढून शिकार करतात. शिकारी लपून राहत असल्याने पक्ष्यांना दिसत नाही. त्यामुळे पक्षी सहज शिकार्याच्या जाळय़ात सापडतात. शंकरपूर परिसरात मागील अनेक दिवसांपासून पक्ष्यांच्या शिकारी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन विभाग मात्र पक्ष्यांना वाचविण्यासाठी काहीच उपाययोजना करतांना दिसून येत नाही. परिसरात पक्ष्यांची चव चाखणार्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने शिकारी अधिकच शिकार करण्याकडे वळले आहेत. परिसरातील पक्ष्यांची संख्या २ ते ३ वर्षापूर्वी अधिक होती. परंतु सद्यस्थितीत पक्ष्यांची संख्या घटली आहे. पारवा पक्षी क्वचितच आढळतांना दिसून येतो तर हारावत पक्ष्याचे अस्तित्वही परिसरात आढळून येत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याच्या मार्गावर आहे. शंकरपूर परिसरातील पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेऊन वन विभागाने पुढाकार घ्यावा व पक्ष्यांच्या अवैध शिकारीवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
शंकरपूर परिसरात पक्ष्यांच्या अवैध शिकारी वाढल्या
By admin | Updated: May 12, 2014 23:41 IST