एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी साजा हद्दीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जारावंडी ते शिरपूर रस्त्याच्या बांधकामासाठी अवैधपणे गौण खनिज काढल्याप्रकरणी तलाठी व कोतवालाने मिळून सात वाहने जप्त केली. याप्रकरणी वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आली असून त्याचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
दि. २४ ला सकाळी १० वाजता नंतर जारावंडीचे तलाठी कमलेश शेख आणि कोतवाल यांनी अवैध गौण खनिज काढल्याप्रकरणी पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी, एक ट्रक अशी सात वाहने जप्त करून जारावंडी येथील महसूल कार्यालयासमोर ठेवली. त्यापैकी दोन ट्रॅक्टरमध्ये गौण खनिज आहे. यातील काही वाहने गायब झाल्याची चर्चा होती. त्याबाबत मंडळ अधिकारी बी.एन. शेख, जारावंडीचे तलाठी कमलेश पराते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी जारावंडीत जाऊन चौकशी केली. त्यानंतर सदर वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आली.