बारदाना उपलब्ध : पुराडा व खेडेगावात धान खरेदीचा शुभारंभकुरखेडा : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने हमीभाव योजनेंतर्गत तालुक्यातील पुराडा व खेडेगाव येथे बुधवारी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही केंद्रावर पुरेशा प्रमाणात बारदाना व इतर साहित्य उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर घेऊन यावे, असे आवाहन व्यवस्थापक बावणे यांनी केले. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती रामलाल हलामी होते. प्रमुख अतिथी म्हणून कोरचीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक डी. एम. सावळे, विपणन निरीक्षक एन. ए. तांबळे, ग्रेडर एस. आर. नाईकवार, उपसभापती पंढरी मांडवे, व्यवस्थापक व्ही. टी. बावणे, संचालक देवराव गहाणे, ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक दिवसांपासून दोन्ही गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेऊन आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने पुराडा व खेडेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
धानाची विक्री केंद्रावरच करा
By admin | Updated: November 10, 2016 02:29 IST