आरसेटीचा उपक्रम : १०० दिवस रोजगार पूर्ण करणाऱ्यांची निवडगडचिरोली : रोहयोंतर्गत १०० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्या रोहयो मजुरांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार २३६ रोहयो मजुरांना स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) च्या मार्फतीने स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे रोहयोच्या कामावर संपूर्ण आयुष्यभर कमी मजुरीत काम करण्याऐवजी त्यांना स्वयंरोजगार स्थापन करता येणार आहे. यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरदिवशी सुमारे ५० हजार मजूर काम करतात. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मजुराने मागणी करूनही रोजगार न दिल्यास त्याला बरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे अन्य साधन उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक रोहयोच्या कामावर जाण्यास पसंती दर्शवितात. २०१४-१५ या वर्षात ४ हजार ४ मजुरांनी १०० दिवसांचे रोहयोवर काम केले आहे. रोहयोचे काम शारीरिक श्रमाचे राहते. मात्र सदर मजूर रोजगार करण्यास इच्छुक असल्याची बाब मात्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे हे नागरिक स्वयंरोजगारही करू शकतात. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर केंद्र शासनाने १०० दिवसांचा रोजगार पूर्ण करणाऱ्या रोहयो मजुराला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या मजुरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) वर आहे. या संस्थेने नियोजन केले असून २०१६-१७ या वर्षात २९ प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
चार हजार रोहयो मजुरांना स्वयंरोजगार प्रशिक्षण
By admin | Updated: April 6, 2016 01:33 IST