गडचिराेली : काेराेना संकटामुळे गतवर्षीपासून ऑनलाईन शिक्षण पद्धती रूढ झाली. घरी बसून विद्यार्थी अभ्यास करीत आहे. चालू शैक्षणिक सत्राची शाळा प्रवेश प्रक्रिया अनेक शाळांनी सुरू केली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शाळांकडून ८० ते १०० टक्के शुल्क आकारण्याचे नियाेजन आहे. संपूर्ण शैक्षणिक सत्र कसे चालते, यावर प्रवेश व शिक्षण शुल्काची रक्कम निर्भर राहणार आहे.
गडचिराेली जिल्ह्यात स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, काॅन्व्हेंट मिळून एकूण ९१ शाळा आहेत. या शाळांकडून विविध बाबींवरील खर्च भागविण्यासाठी प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क व इतर प्रकारची फी पालकांकडून घेतली जाते.
गतवर्षी काेराेनामुळे इयत्ता चौथीपर्यंतचे सर्वच खालचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाही. ऑनलाईन पद्धतीने शाळा चालविण्यात आल्या. अनेक शाळांनी गतवर्षी शुल्कात कपात केली. यावर्षीचे शैक्षणिक सत्र नेमके कसे चालते, यावर फी आकारणी हाेणार आहे.
काेराेनाचे संकट पूर्णत: आटाेक्यात येऊन प्रत्यक्ष वर्ग भरले तर शाळा व संस्थांकडून त्यांची ठरलेली १०० टक्के फी आकारण्यात येणार आहे. तसे न झाल्यास ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सर्वच शाळा शुल्क कमी करणार आहेत, तशी अपेक्षाही पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स....
ऑनलाईन शाळांमुळे वाचताे खर्च
- प्रत्यक्ष वर्ग भरलेल्या शाळा व ऑनलाईन शिक्षण पद्धती यात बरीच तफावत आहे. प्रत्यक्ष वर्ग पद्धतीही अत्यंत प्रभावी ठरते.
- ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शाळांमधील वीज, क्रीडा साहित्य, शाळांमधील इतर शैक्षणिक सुविधा व स्वच्छतेवरील खर्च कमी हाेताे.
- नामांकित माेठ्या शाळा शिक्षक व कर्मचारी कमी करीत नाही. मात्र, यावरील लहान शाळांचा खर्च वाचताे.
बाॅक्स...
शाळा ऑनलाईन असली तरी खर्च येताेच
काेराेना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून मागील सत्रात ऑनलाईन शिक्षण पद्धती चालविण्यात आली. यामध्ये शुल्क आकारणीत अडचणी निर्माण झाल्या. पालकांनी दिलेल्या फीमधून शाळा प्रशासन चालवावे लागते. यामध्ये शिक्षक, कर्मचारी पगार, बिल्डिंग मेंटेनन्स व इतर बाबींवर खर्च करावा लागताे. शाळा चालविण्यासाठी शुल्क घ्यावेच लागेल.
- केशवन कवंडर, सचिव/मुख्याध्यापक,
पॅराडाईज स्कूल आरमाेरी
................
काेराेनामुळे गतवर्षी प्रायमरी वर्गाला २० टक्के व माध्यमिक वर्गाला ८० टक्के फी घेण्यात आली. बहुतांश पालकांनी फी भरलेली नाही. यावर्षीच्या ऑनलाईन वर्गाची फी ठरलेली नाही. स्टेशनरी, पगार खर्च भागविण्यासाठी यावर्षी वाजवी शुल्क आकारण्यात येणार आहे.
- विवेक सहारे, शिक्षण संस्था सचिव,
निशिगंधा स्कूल, चामाेर्शी
बाॅक्स...
१०० टक्के फी कशासाठी
काेराेनामुळे गतवर्षी ऑनलाईन शिक्षण पार पडले. यात शाळांचा खर्च कमी झाला. काेराेनामुळे अनेक व्यवसाय माेडकळीस आले असून, राेजगारावर परिणाम झाला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शाळांनी यावर्षी विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करावे, अशी माझ्यासह अनेक पालकांची मागणी आहे.
- रवींद्र निंबेकार, आरमाेरी
................
काेराेना संकटामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा राेजगार बुडाला. अनेकजण बेराेजगार झाले. आर्थिक परिस्थिती खालावल्याने विनाअनुदानित शाळांनी यावर्षी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश व शिक्षण शुल्क कमी करण्याची गरज आहे. १०० टक्के शुल्क आकारल्यास ते साधारण पालकाला अदा करणे शक्य हाेणार नाही. शासनाने तशा सूचना शाळांना कराव्यात.
- प्रवीण उंदीरवाडे