जि. प. शाळांची स्थिती : विद्यार्थी एका तर टीसी दुसऱ्या शाळेतदेसाईगंज : बालकांना सक्तीचे शिक्षण कायदा २०१३ च्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. गावकऱ्यांनी देखील मोठा गाजावाजा करीत नवीन वर्ग सुरू केले. मात्र सुज्ञ पालकांना उच्च शिक्षणाकरिता दुसऱ्या शाळेत जाण्यास जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी मज्जाव केला आहे. तसेच कार्यरत शाळेत स्वत:चे पद कायम ठेवण्याचाही आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. यावर जिल्ह्यातील शिक्षण विभागाने चुप्पी साधली आहे. बालकांना सक्तीचा शिक्षण कायदा २०११ च्या निकषानुसार वर्ग ५ वी करिता १ किमी व वर्ग ८ वीकरिता ३ किमी अंतराची अट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ वी व ८ वीचे नवीन वर्ग सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील जि. प. शाळांची गुणवत्ता पाहता, उच्च शिक्षणाकरिता आलेल्या वर्ग ५ वी किंवा ८ वीच्या विद्यार्थ्यांना सुरूवातीपासून अ, ब, क चे शिक्षण द्यावे लागते, अशी दयनिय अवस्था जिल्हा परिषद शाळांची सध्यस्थितीत झाली आहे. याला काही शाळा अपवादही असतील तरी ६० टक्के शाळांमध्ये सदर परिस्थिती दिसून येत आहे. खासगी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा पूर्ववत पाया मजबूत करण्यात शिक्षकांचा वेळ जातो. जिल्ह्यातील कित्येक शाळा दोन किंवा तीन शिक्षकी आहेत. वर्ग ५ व शिक्षक ३ अशी स्थिती अनेक शाळांमध्ये पहावयास मिळते. त्यापैकी एक शिक्षकी शाळेतील शिक्षक नेहमीच लिखानाच्या कामात व्यस्त असतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. परिणामी अभ्यासक्रम संपूर्ण शैक्षणिक सत्रात पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाअभावी अनेक अडचणी परीक्षेदरम्यान जाणवतात. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरीही नवीन कायद्यानुसार वर्ग ५ व ८ वर्ग घेण्यास गावातील पुढाऱ्याच्या पाठिंब्यामुळे शिक्षक धजावत आहेत. जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता चवथीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच गावातील खासगी शाळेमध्ये विद्यार्थी जातात. मात्र नवीन कायद्यामुळे खासगी शाळेतील वर्ग ५ च्या तुकडीला विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. पाल्यांना शिक्षण कुठे द्यायचे हा संबंधित पालकांचा हक्क आहे. त्यांचा वैयक्तिक प्रश्नही आहे. घटनेने तसे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेत स्वत:चे पद कायम राखण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पालकांना टीसी देण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळेच टीसी एका शाळेत तर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील बोडधा येथे इयत्ता ८ वी रावनवाडी येथे इयत्ता ५ वा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना टीसी देण्यास नकार दिला आहे. वरिष्ठांकडे तक्रार देऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हीच स्थिती जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही दिसून येत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील काही पदवीधर शिक्षक स्वत:चे पद कायम ठेवण्यासाठी टीसी देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)
शाळा विद्यार्थ्यांवर अडल्या
By admin | Updated: July 18, 2014 00:05 IST